पायाभूत सुविधा

फणसवळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत असून प्रशासकीय कामकाज सुचारूपणे पार पडते. पाणीपुरवठा योजना मधलीवाडी व कोंडवाडी येथे न.पा.पु. योजनेद्वारे कार्यरत आहे, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजनांचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.

सार्वजनिक सुविधा म्हणून बौद्धवाडी येथे ओपन जिम उभारण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेअंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखड्यातील सर्व तीन महसूल गावांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रस्ते आणि रस्त्यावरील दिव्यांसाठी ग्रामपंचायतीतर्फे ३०० LED दिवे बसविण्यात आले आहेत.

शिक्षणाच्या दृष्टीने, मधलीवाडी येथे इयत्ता १ ते ७ वी पर्यंत व कोंडवाडी येथे इयत्ता १ ते ४ वीपर्यंत शाळा आहेत, दोन्ही ठिकाणी स्वतंत्र शाळा इमारती आहेत. लहान मुलांच्या संगोपनासाठी तिन्ही महसूल गावांत तीन अंगणवाड्या कार्यरत आहेत. आरोग्य सेवेसाठी हातखंबा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोंडवाडी येथे उपकेंद्र आहे.

गावाच्या सामाजिक आणि क्रीडा विकासासाठी मधलीवाडी फणसवळे शाळा क्र. १ येथे खेळाचे मैदान आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात २० स्वयं-साहाय्य गट सक्रियपणे कार्यरत आहेत. नागरिकांच्या प्रवासासाठी रत्नागिरी येथून शहरी बससेवा उपलब्ध असून दळवीवाडी, गुरववाडी, भावेवाडी, कोंडवाडी, पवारवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी आणि खोतवठार येथे बसथांबे आहेत.

आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आणि लसीकरण मोहिमा नियमितपणे राबविल्या जातात, ज्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.